09/02/2025
दि २६ जानेवारी २०२५ रोजी
नव महाराष्ट्र संघाच्या ६६ व्या स्थापनादिनानिमित्त आपल्या क्रिडांगणावर आयोजित केलेल्या पुजा समारंभास संस्थेचे ज्येष्ठ - श्रेष्ठ सदस्य, सर्व खेळाडू, त्यांचे पालक, हीतचिंतक उपस्थित होते.
क्रिडांगणाची पूजा संस्थेचा माजी राष्ट्रीय खो-खो खेळाडू,
वीर अभिमन्यू परितोषिक विजेता, दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या पहिल्या विश्वचषक
खो-खो स्पर्धेत ज्याने ऑस्ट्रेलीयचा संघ उभा करून सहभाग घेतला अशा श्री. राजेंद्र सुरा ह्याचे हस्ते करण्यात आली. श्री सुरा ह्याने या स्पर्धेत सर्वात ज्येष्ठ सहभागी खेळाडूचा विक्रम प्रस्थापित केला. श्री सुरा हे ५८ व्या वर्षी या स्पर्धेत खेळाडू म्हणून सहभागी झाले होते. त्यांनी आपल्याच संस्थेच्या गुरुवर्य कै शंकरराव पाटणकर ह्यांचा विक्रम मोडला. गुरुवर्य पाटणकर हे वयाच्या ४२ वर्षापर्यंत स्पर्धात्मक खो खो खेळले. श्री सुरा हे ऑस्ट्रेलिया
खो-खो फेडेरेशनचे खजिनदार आहेत.
संस्थेचे प्रमुख सचिव श्रीरंग इनामदार ह्यांनी वर्षभरातील संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत विश्वविजयी भारतीय संघाचे आपल्या संघाच्या सर्वश्री प्रतीक वाईकर (कर्णधार), सुयश गरगटे, आदित्य गणपुले, पुरुष संघाचे मार्गदर्शक शिरीन गोडबोले,
तांत्रिक तज्ञ् सचिन गोडबोले ह्यांनी प्रतिनिधित्व केले तर श्री राजेंद्र सुरा आणि सुबोध बापट ह्यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले. ह्या सर्वांचा गुरुवर्य श्री सुरेश दिनकर ह्यांचे हस्ते कौतुकपर सत्कार करण्यात आला. या पहिल्या विश्व चषक खो-खो स्पर्धेत खेळाडू, मार्गदर्शक आणि संघटनात्मक क्षेत्रात आपल्या संस्थेच्या सर्वात जास्त सदस्यांनी प्रतिनिधित्व केले याचा अभिमान वाटतो.
सर्वश्री प्रतीक, सुयश, आदित्य आणि राहुल मंडळ हे उत्तराखंड येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रवाना झाल्यामुळे या समारंभास उपस्थित नव्हते. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचा ध्वज धारक म्हणून श्री प्रतीक वाईकर ह्यास मान मिळाला आहे.
वरील सर्वांचा आपल्या क्रिडांगणावर येणाऱ्या पालकांच्या वतीने देखील संस्थेचे एक संस्थापक सदस्य श्री चंद्रकांत कवठेकर ह्यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वरील सत्कारार्थिंशिवाय गुरुवर्य सुरेश दिनकर, श्री नरहरी जोग आणि श्री श्रीरंग इनामदार ह्यांचा या प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद पटवर्धन हे परदेशी गेले असून त्यांनी तेथून आपले मनोगत या प्रसंगी पाठविले, ते श्री श्रीरंग इनामदार ह्यांनी उपास्थीतांना वाचून दाखविले.
पालक सौ कस्तुरी आणि
श्री श्रीप्रसाद आपटे ह्यांनी या प्रसंगी मिठाई वाटून संस्थेचे कौतुक केले.
उपस्थितांचे आणि वर्षभर संस्थेला विविध मार्गांनी मदत करणाऱ्या सर्व पालकांचे, देणगीदारांचे, अशा सर्वांचे श्री श्रीरंग इनामदार ह्यांनी आभार मानले. त्यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला. सोबत कार्यक्रमाची क्षणचित्रे पाठवीत आहे.
श्रीरंग इनामदार.