11/07/2023
खासदार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातून स्थानिक
क्रीडापटू आणि कलाकार शोधण्याचे प्रयत्न व्हावेत!!
********************************************
नागपुरात दोन तीन वर्षापासून आयोजित खासदार क्रीडा महोत्सव, चांगल्या तऱ्हेने आयोजित असतो. स्पर्धेला दरवर्षी
अतिशय चांगला प्रतिसादही मिळतोय, त्यामुळे साहजिकच सर्व खेळांचे दरवर्षी निकाल संग्रहीत असणेही तेवढेच महत्वाचे आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेतील निकाल जसे संग्रही असतात तसे खासदार क्रीडा महोत्सवातील सर्व खेळांचे निकालही संग्राही ठेवल्या गेले तर,नागपुरातील क्रीडा स्पर्धेचा स्तर उंचावला किंवा नाही हे पटकन लक्षात येऊ शकते. विशेषतः एथलेटिक्स मधील निकाल किमान निश्चितच संग्रही असावेत, अशी आग्रही सूचना आयोजन समितीला करावीशी वाटते.
अर्थात,आयोजन आणि तांत्रिक समितीत क्रीडा परिसरातील अनुभवी व्यक्ती असल्यामुळे या स्पर्धेचे निकाल निश्चितच संग्रही असतील असे मला वाटते. यातून बऱ्याच चांगल्या खेळाडूंची शोधले जाऊ शकतात. त्यांची रीतसर निवड करून त्यांना पुढील प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न व्हावेत असे वाटते. आणि तसे झाले तर या खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाचा एक महत्वाचा उद्देश सफल होऊ शकतो. खेळांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायिक रूप आल्याने भविष्यात खेळाच्या माध्यमातून देशातील खेळाडूंचे से भविष्य उज्वल ठरत आहे तसेच या महोत्सवातून पुढे येणाऱ्या खेळाडूंचे भविष्यही उज्वल ठरू शकते. खासदार महोत्सवाच्या माध्यमातून जर काही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूर अथवा विदर्भाचे प्रतिनिधित्व करु लागले,तर खासदार महोत्सव आयोजित करण्याचा उद्देश सफल झाल्यासारखच समजा! त्यामुळे आयोजन समितीने लहान वयोगटातील मुला मुलींचे दरवर्षी स्पर्धेतील निकालाची राज्य व राष्ट्रीय स्तरावरील त्याचं वयोगटातील मुलामुलींच्या निकालाशी तुलना करावी आणि चांचणी करावी. त्यामुळे आपले हे खेळाडू नेमके कुठे सरस आहेत वा कुठे कमी आहेत. याचा पडताळा करावा. तो झाल्यानंतर अशा दर्जेदार प्रदर्शन करणाऱ्या या लहान वयोगटातील खेळाडूंना उत्कृष्ठ प्रशिक्षण सोयी कशा पूरवता येतील याची पुढे जवाबदारी निश्चितच सबंधित खेळाच्या जिल्हा संघटनांनी घ्यावी असे वाटते. यावरच नागपुरातील खासदार क्रीडा
महोत्सवाचे यश अवलंबून राहील. अन्यथा हा क्रीडा महोत्सव
आधीच्या काळासारखा केवळ मनोरंजनासाठीच आयोजित करण्यात येतो असा त्याचा अर्थ होईल. कृपया असे होऊ देऊ नका!
खासदार सांस्कृतिक महोत्सवाबाबतही यंदा थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार व्हावा असे वाटते. देशातील व्यवसायिक कलाकार बोलवून नागपूरकरांचे निव्वळ मनोरंजन करणे हाच केवल उद्देश न ठेवता स्थानिक कलाकारांना विशेषतः शाळा कॉलेजातील तरुण उभरत्या कलाकारांना एकत्रित करून त्यांच्यासाठी विविध वयोगटात स्पर्धेचे आयोजन केल्यास चांगले कलाकार शोधण्याचा जर या सांस्कृतिक महोत्सवातून प्रयत्न झाल्यास बऱ्याच कलाकारांना भविष्यात मोठा मंच शोधण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. महोत्सवाच्या 15 दिवसांपैकी 10 दिवस स्थानिक उभरत्या कलाकारांच्या गायन, शास्त्रीय गायन, नृत्य, वाद्य संगीत अशा विविध गटात स्पर्धेचे आयोजन केल्यास शहरातील प्रतिभेचा शोध या खासदार सांस्कृतिक महोत्सवातून निश्चित घेता येईल.
उरलेल्या 5 दिवसात बाहेरच्या देशातील दिग्गज कलाकारांना बोलावून नागपूरकर रसिकांचे मनोरंजन करता येईल.