28/07/2026
कुस्तीला खरा राजाश्रय देणारे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
कुस्ती आणि ग्रामीण खेळांच्या विकासासाठी आयुष्यभर झटलेले स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांची आज जयंती. कुस्तीसारख्या मातीतल्या खेळाला त्यांनी दिलेला राजाश्रय आणि खेळाडूंना दिलेले निःस्वार्थ पाठबळ महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका हा राजकीय कुरुक्षेत्र म्हणून ओळखला जात असला, तरी राजे साहेबांनी कधीही खेळात राजकारण आणले नाही. खेळाडूचा गट, तट, जात किंवा विचार न पाहता केवळ त्याची गुणवत्ता आणि मेहनत यालाच त्यांनी प्राधान्य दिले.
सन १९८० पासून शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मॅटवरील कुस्ती स्पर्धांची सुरुवात केली. त्या काळात ग्रामीण भागात मॅट कुस्तीला प्रोत्साहन देणे ही दूरदृष्टीची बाब होती. या स्पर्धांतून होतकरू मल्ल शोधून त्यांना मासिक मानधन देण्याची अभिनव योजना त्यांनी सुरू केली. आज अनेक नामांकित पैलवान घडण्यामागे या योजनेचा मोठा वाटा आहे.
यापूर्वीही १९६० ते १९८० या काळात सरपिराजीराव घाटगे ट्रस्टच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना आर्थिक मदत करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली होती.
खेळासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करणारा आदर्शवत कारखाना
ग्रामीण भागातील कुस्ती आणि इतर खेळांना चालना देण्यासाठी शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ₹४० लाखांचा खर्च करण्यात येत असे. गेल्या चार दशकांचा विचार केला तर खेळासाठी तब्बल ₹८ ते ₹१० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च झाला आहे. सहकार क्षेत्रात खेळासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात सातत्याने आर्थिक पाठबळ देणारी संस्था विरळाच आढळते.
यामुळेच राजर्षी शाहू महाराजांनंतर कुस्तीला खऱ्या अर्थाने राजाश्रय देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.
त्यांच्या दूरदृष्टीतून घडले अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू
शाहू कारखान्याच्या माध्यमातून कुस्तीबरोबरच ॲथलेटिक्स, जलतरण, शरीरसौष्ठव आणि इतर खेळांनाही सातत्याने प्रोत्साहन मिळाले. आर्थिक अडचणींच्या काळातही क्रीडा उपक्रम कधी बंद पडू दिले नाहीत.
या राजाश्रयातून अनेक नामवंत खेळाडू देशाला लाभले. त्यामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते राम सारंग, आशियाई स्पर्धेतील पदक विजेते भारत पाटील आणि सुनील पाटील, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विक्रम कुराडे, तानाजी नरके, रणजीत नलवडे, सोनबा गोंगाणे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, मल्लसम्राट अस्लम काझी, नितीन खुर्द, कौतुक डाफळे, भारत श्री व महाराष्ट्र श्री सुहास खामकर, ऑलिम्पियन जलतरणपटू विरधवल खाडे, आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत तसेच ज्योती पवार आणि बाजीराव परिट यांसारख्या अनेक खेळाडूंनी देशाचे नाव उज्ज्वल केले.
बंद पडलेल्या तालमींना दिले नवे जीवन
कुस्तीची खरी ताकद तालमीत असते, हे राजे साहेबांनी ओळखले होते. त्यामुळे जिल्ह्यातील बंद पडलेल्या तालमी पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली. कुस्ती मैदानांसाठीही विशेष निधी उपलब्ध करून दिला.
या निर्णयामुळे अनेक वर्षे ओस पडलेल्या तालमी पुन्हा गजबजल्या. सकाळ-संध्याकाळ शड्डू घुमू लागले आणि नव्या पिढीतील अनेक मल्ल घडू लागले. हा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्तीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला.
स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या कार्याचा गौरव शब्दांत मांडणे अशक्य आहे. त्यांनी लाल मातीच्या कुस्तीला दिलेला राजाश्रय आणि खेळाडूंवर केलेले प्रेम यामुळे संपूर्ण कुस्तीविश्व त्यांचे सदैव ऋणी राहील.
राजे साहेब, आज आपण आपल्यात नसाल; पण आपल्या कार्याचा सुगंध लाल मातीत कायम दरवळत राहील. आपल्या कार्याची प्रेरणा पुढील अनेक पिढ्यांना दिशा देत राहील.
विनम्र अभिवादन!
– पैलवान रामदास देसाई
संकल्पक – कुस्ती हेच जीवन
मो. ९५९४९९५०६५