24/05/2021
विजय कदम
कोल्हापूरचे राॅबर्टो बॅजिओं...!
'फुटबॉल' सामन्यात एखाद्या खेळाडूने एक गोल नोंदवला की, त्याचे कौतुक होते.दोन केले तर अधिक कौतुक होते.
आणि जर हॅटट्रिक केली तर अमाप असे कौतुक त्याच्या वाट्याला येते.
परंतु जर एकाच सामन्यात एक दोन नाही तर.. सलग 'पाच' गोल कुणी केले;
तेही समोर विरुद्ध एखादा गोव्यातील फुटबॉल संघ असेल तर...? स्पर्धासुद्धा मोठी राज्यस्तरीय असेल तर..?
आणि हे सगळे विद्युत झोतात सामने असतील तर..?
काय मजा आली असेल..विचार करा.
किती रोमांच, आनंद प्रेक्षकांनी अनुभवला असेल..?
हे प्रत्यक्षात साकार केलेले खेळाडू म्हणजे पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम) चे माजी खेळाडू विजय कदम.
विजय दिनकर कदम हे पूर्ण नाव. मंगळवार पेठेतील तस्ते गल्लीच्या कोप-यावरचं त्यांचे घर.विजय कदम म्हणजे फुटबॉल कौशल्य.आणि फुटबॉल कौशल्य म्हणजेच विजय कदम. असे तेव्हा समीकरण बनले होते.
असा एकेकाळी त्यांचा खेळ कोल्हापूरकरांनी अनुभवला आहे. तो तसाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅराडोनाचा काळ होता. १९८६ मेक्सिको वर्ल्ड कप अर्जेंटिनाने जिंकला होता. पण साधारण त्याच दरम्यान कोल्हापूरात, मुंबईतही या विजय कदम रूपी मॅराडोनाची खेळी गाजत होती. कुणी त्यांना मॅराडोना म्हणायचे तर अन्य काही वेगळ्या नावाने बोलवायचे; पण मी मात्र त्यांना *राॅबर्ट बॅजिओ* म्हणायचो. कारण तत्कालीन इटलीच्या राॅबर्ट बॅजिओ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय खेळाडूप्रमाणे ते खेळायचे. आणि दिसायचेही.
बॅजिओप्रमाणे फुटबॉल कौशल्याची यांची बॅग कायम भरलेली होती. राजर्षी शाहू स्टेडियमवर सकाळी सराव करताना, सगळ्यांचा सराव संपला तरी फुटबाॅल व ते दोघेचं कितीतरी वेळ एकत्र असायचे हे पहातचं आम्ही मोठे झालो. दोघांचं नातं इतकं घट्ट बनलं होतं की, बाॅल सदोदित यांच्या पायाला चिकटलेलाचं जणू..!
आमचे आदर्श खेळाडूंपैकी एक.गोव्याच्या फुटबॉल संघांचा दर्जा हा कायम आपल्यापेक्षा चांगलाच असायचा.
आणि त्यांनी आजवर कोल्हापूरातून अनेकवेळा स्पर्धा जिंकून गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे त्यांची क्रेझ कोल्हापूरात कायम असायची. आजही आहे.
त्यामुळे गोव्याच्या संघाविरुद्ध एका सामन्यात पाच गोल करण्याची अफलातून कामगिरी विजय कदमनी राजर्षि शाहू स्टेडियमवर केली आणि त्यांना थेट बॅंक ऑफ इंडिया फुटबॉल संघ, मुंबई येथे नोकरीच मिळाली.
त्याचे असे झाले की,सन १९८५-८६ ची ही घटना आहे.
नुकतेच भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन झालेले होते. त्यामुळे त्यांचे स्मरणार्थ समाजवादी तथा एस. काॅंग्रेसचे
तत्कालीन नगरसेवक रामभाऊ फाळके ( जे त्यावेळी शरद पवारांचे सगळ्यात खास व्यक्ती होते. कारण एस.काॅंग्रेसच्या कोल्हापूरातील प्रमुख नेत्यांपैकी ते एक होते.) तर त्यांचे पुढाकाराने दिलबहार तालीम मंडळातर्फे पहिल्यांदाच कोल्हापूरात कै. यशवंतराव चव्हाण चषक विद्युत झोतातील फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमवर सुरू होती. अतिशय नेटक्या नियोजनात झालेली ही त्यावेळची एक मोठी स्पर्धा म्हणावी लागेल.थंडीच्या दिवसात झालेली ही स्पर्धा आजही आठवते. रात्रीचे सामने असायचे. विद्युत झोतात खेळणारे खेळाडू जेवढे रोमांचक क्षण अनुभवयाचे तितकेच आम्ही प्रेक्षकही. तर या स्पर्धेत बिदेश स्पोर्ट्स, गोवा विरूद्ध पीटीएम, कोल्हापूर चा सामना होता. आणि सामना पहायला बॅंक ऑफ इंडियाचे फुटबॉल प्रशिक्षक, व्यवस्थापक, आणि फुटबॉल संघही मैदानावर हजर होते. कारण त्यांचाही संघ स्पर्धेत सहभागी होता.
तेव्हा बाहेरील संघांना सर्रास कोल्हापूरात आमंत्रित केलं जायचे. याचा फायदा विजय कदमना झाला. एकाचं सामन्यात पाच गोल करीत त्यांनी सगळ्या प्रेक्षकांसह फुटबॉल समिक्षकांचे लक्ष वेधले. दुस-या दिवशी दै.पुढारीत बातमीत फोटोसह चौकट आलेली..*एक नव्हे पाच.* ( सोबत पेपर कटिंग आहे.)
या एकाचं सामन्याने त्यांचे नशिब पालटलं.
बॅंक ऑफ इंडियावाले त्यांना सोबत घेऊनच मुंबईला गेले.
या अगोदर युनियन बॅंकेकडून प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे विश्वास कांबळे व मुंबई कस्टम्स कडून शिवाजी तरूण मंडळाचे अकबर कमानदार हेही मुंबईत खेळत होते व फुटबॉलमुळे नोकरीतही होते. त्यांचे पाठोपाठ कोल्हापूरचे खेळाडू विजय कदमही मुंबईत खेळू लागल्याने कोल्हापूरचे मुंबईत खेळणारे खेळाडू वाढू लागले. नंतर शिवाजी पाटील, सुधाकर पाटील, किशोर खेडकर यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली.
(या प्रत्येकाची फुटबॉल कहाणीसद्धा वेगळी आहे.)
तर.. अशाप्रकारे विजय कदमनी बॅंक आॅफ इंडियाकडूनही मुंबईत पदार्पणातचं चमकदार कामगिरी केली. सन १९८६ ला प्रसिद्ध हारवूड लीग विजेतेपद संघाने मिळवले. ( सोबत कात्रण पहा. ज्यामध्ये आजचे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन WIFA, मुंबईचे Henry Menezes ही दिसतात. ते गोलकिपर होते.)
विजय कदमांना बॅंकेकडून वर्षातचं कायम नोकरी मिळूनही त्यांनी पुढील वर्षी राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायजर्स ( R.C.F.) मुंबई च्या 'अ' संघाकडून खेळायला प्राधान्य दिले. कारण त्यावेळी RCF चे दोन संघ होते. शिवाय सुविधाही उत्तम होत्या.
त्या संघाने १७ वर्षांनतर मुंबई लीग १९८७ ला जिंकली. १९८८ लाही तेचं विजेते ठरले.
अशाप्रकारे सलग तीन वर्षे हारवूड लीग विजेत्या संघातील खेळाडू होण्याचा बहुमान त्यांचे नावावर नोंदवला गेला. जो कदाचित अन्य कुणाला मिळाला नसेल.
इतरही देशभर अनेक ठिकाणी स्पर्धांसाठी संघ खेळत राहिला. यामुळे विजय कदम यांचा तिथं मुंबईतही चाहता वर्ग निर्माण झालेला होता.
लेफ्ट आऊट किंवा लेफ्ट हाफ या जागेवर खेळताना त्यांनी डाव्या पायाची करामत दाखवलेली होती. जनरली डाव्या बाजूनी खेळणारे खेळाडू डावरे असतात पण हे अपवाद होते कारण उजवे-डावे पाय तितकेंचं सक्षम चालायचे. डाव्या बगलेतून टचं लाईनवरून चेंडू पळवत नेत गोल करणे असो की, फ्रीकीक वा काॅर्नरवरची बाॅलला दिलेली फिरकी दिशा. गोलकिपर बघत बसण्याशिवाय काही करू शकणार नाही असा अचूक गोल करायचे. त्यांनी आपल्या खेळाने अनेकांना आपलेसे केलेले होते. परंतु तुलनेने त्यांनी खेळातून लवकर निवृत्ती घेतली असे त्यांच्या चाहत्यांची तक्रार कायम राहिली. १९९४ च्या आसपास त्यांनी खेळ थांबवला.व्यक्ती म्हणून म्हणाल तर हळूवार शांत बोलणं. तरीही विनोदी. हसतमुख आणि आनंदी स्वभाव. आम्ही एकाचं गल्लीत राहत असल्याने, त्यातही लहानपणीची काही वर्षे शेजारी राहिल्याने त्यांचा प्रभाव होताचं. त्यांच्या घरातील व्हरांड्यात चेंडू नियंत्रण करत तासन् तास सराव करताना मी पाहिलेलं आहे. किंबहुना त्यातून आम्हालाही धडे मिळायचे.पण तोंडांत बोटं घालून बघणे हे अनुभवायचो.त्यांचे काका म्हणजे कै. पांडुरंग कदम ते संस्थानकालीन बाराईमाम फुटबॉल संघाचे स्टार खेळाडू होते. त्यामुळे घरी फुटबॉल वातावरण होतेच. पण..पीटीएम परिसरात तेव्हा उत्तम फुटबॉलपटू होण्याची जणू चढाओढचं होती. या खेळाने झपाटून टाकलेली ती सगळी युवा पिढी होती. पीटीएमचा तो संघचं आजवरच्या पीटीएम संघांपैकी सर्वोत्तम संघ मला आजही वाटतो.
अनेक लोकांच्या खेळाने, मार्गदर्शनाने, प्रोत्साहनाने आम्हीही फुटबॉल या खेळावर प्रेम करू लागलो होतो. त्यापैकी विजय कदम हेही एक. त्यांचा खेळ पाहून माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळाली.
तांत्रिकदृष्ट्या म्हणाल तर फुटबॉल नियंत्रण आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य व गोल नोंदवण्याची वेगळीच तशी क्षमता
असणारे मोजके खेळाडूपैकी ते एक होते. . अशीच क्षमता नंतर रिची फर्नांडीस या खेळाडूकडेही जाणवली.
शाहू स्टेडियमवर सकाळी सरावाला गेल्यावर,
मुंबईतून कोल्हापूरला आवर्जून आलेले त्यावेळी सुधाकर पाटील किंवा विजय कदम हे आम्हा ज्युनिअर खेळाडूंना काहीतरी नवनवीन शिकवत रहायचे. पण..आम्ही यांचा सरावातील खेळ पाहूनही खूष व्हायचो. इतकी जादुगिरी ते खेळताना दाखवायचे.आज विजय कदम यांचा वाढदिवस.
आता लवकरचं नोकरीतूनही दीड एक वर्षात ते निवृत्त होतील.त्यांना दिर्घायुष्य लाभावे हीचं सदिच्छा...!!