06/04/2024
#समाधान #
काही दिवसांपूर्वी अचानक एक गृहस्थ आपल्या अकादमीत दाखल झाले... मी त्यावेळेस मुलांना कोचिंग कऱण्यात व्यस्थ होतो. त्यांनी प्रवेश करताच सैरावैरा नजर टाकली जस ते कोणाला तरी आतुरतेने शोधत होते...मी अकॅडमीतील प्रवेशद्वारा जवळ उभे राहून मुलांना मार्गदर्शन करन्यात व्यस्त होतो, माझी नजर अचानक त्या गृहस्थांकडे गेली त्यांच्या नजरेतील ती आतुरता व कुतूहल मला स्पष्टपणे जाणवत होते. तेवढ्यात त्यांची नजर माझ्याकडे गेली व त्यांनी मला जवळ येऊन कुतुहलतेने विचारले "सर ओळखले का मला कदाचित तुम्ही मला विसरले असाल"त्यांच्या नजरेतील मला भेटण्याची ती उत्सुकता मला स्पष्टपणे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. तेवढ्यात मी चेहऱ्यावर स्मित हास्य करून त्यांना आपण "डॉक्टर खडके"तन्मय खडके याचे पालक..बोला सर कसे आहात आपण, आणी तन्मय चे कसे चालू आहे , सध्या ट्रेनिंग करतोय का नाही अशी विचारपूस केली.मी त्यांना किव्वा अकॅडमीतील तन्मयला आजूनही विसरलो नाही हे पाहून त्यांना सुखद वाटले.ते म्हणाले सर आपण मला आणि माझा चिरंजीव तन्मयला स्मरणात धेवले हि विशेष बाब आहे...मी स्मित हास्य करत म्हणालो, सर काही खेळाडू हे आमच्या कायमचे स्मरणात असतात, तशी कायमची जागा आमच्या हृदयात त्यांनी तयार केलेली असते.त्यांच्या त्या आठवणी पुसट होने शक्य नाही... तन्मय हा त्यातील एक आहे...एवढे बोलून मी तन्मय सोबत असलेल्या त्या आठवणींमध्ये रमलो व काही कालावधी करता त्यात हरवून गेलो. आपल्या मितभाषी स्वभावाने चाणाक्ष बुद्धिमत्ता, चपळता , समजूतदारपणा तसेच क्रीडा प्रेमी व मेहनती व्यक्तिमत्व असलेल्या तन्मयने त्यावेळेस एवढ्या लहान वयात सर्वांची मने जिंकली होती. माझ्या मते तो अकॅडमीत दुसरीत असताना सन २०१२ते २०१५ या कालावधीत नियमित प्रशिक्षणासाठी होता. आपल्या खडतर प्रशिक्षणाने त्याने अल्पावधीतच ११ वर्षाआतील मुले या वयोगटात आपला दबदबा धुळे,नंदुरबार ,जळगाव, नाशिक या चारही जिल्ह्यांमध्ये तयार केला होता. पुढे त्याने अनेक जिल्हास्तरीय, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट खेळाची चुणुक दाखवून सर्वांच्याच हृदयात आपले एक विशेष स्थान निर्माण केले होते. तो अकॅडमीत साधारणतः दुसरी ते सहावी पर्यंत असताना प्रशिक्षण घेत होता. करिअरच्या उच्चांकावर असताना त्याच्या पालकांची औरंगाबाद येथील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज येथे बदली झाली व त्यास इच्छा नसतानाही स्थलांतर करावे लागले. त्याच्यासोबत असलेल्या आठवणींना उजाळा देत अचानक मी भूतकाळात हरवल्या सारखे वाटले. तेवढ्यात मला त्याच्या पालकांनी म्हणजेच डॉक्टर खडके यांनी तो आता बारावीची परीक्षा पास होऊन नीट परीक्षेद्वारे उत्तम गुण मिळवून मुंबई येथील के.एम.कॉलेज येथे एमबीबीएस पदवी अभ्यासक्रमास प्रथम वर्षात शिकत असून त्याची पुढील शैक्षणिक वाटचाल चालू असल्याचे सांगितले.तसेच सध्या त्याची बॅडमिंटन प्रॅक्टिस रोज सुरु असून नुकत्याच झालेल्या मुंबई विभाग आंतरमहाविद्यालयीन मेडिकल कॉलेज बॅडमिंटन स्पर्धेमध्ये त्याने त्याच्या सहकारी खेळाडू सोबत बॅडमिंटन दुहेरी स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावल्याचे सांगितले. पूर्ण मुंबई शहरामध्ये सध्याची त्याची जोडी अव्वल असल्याचे समाधानपूर्वक विधान त्यांनी केले. ते सांगताना सार्थ अभिमान त्यांच्या डोळ्यात झळकत होता. त्याची ही शैक्षणिक क्षेत्रातील व क्रीडा क्षेत्रातील प्रगती पाहून त्यांची गर्वाने मान उंचावल्याचे दिसत होते. त्यांनी माझा फार वेळ न घेता त्यांनी सोबत आणलेली भेटवस्तू मला स्वीकारण्याची विनंति केली. पालक म्हणून माझ्या पाल्याच्या सर्वांगीण विकासात आपण दिलेल्या योगदानाबद्दल मी आपणास एक छोटीशी भेटवस्तू तन्मयच्या आठवणीस्तर देत असल्याचे त्यांनी सांगितले. मीही त्यांचे मन राखत ती आनंदाने स्वीकारली. परंतु मला भेटवस्तूपेक्षा त्यांच्या डोळ्यातील ती कृतज्ञता व तन्मयने केलेल्या भावी वाटचालीविषयी समाधान जास्त महत्वाचे वाटत होते. मी ती भेटवस्तू स्वीकारून तन्मयच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या व पुढेही त्याची यशस्वी वाटचाल सुरू राहो ही अपेक्षा व्यक्त केली. व प्रशिक्षक म्हणुन मला त्यास प्रशिक्षण देण्याचे भाग्य लाभले याचे विलक्षण समाधान वाटले.
प्रा. शरतान चौधरी
(Badminton N.I.S Coach.)
Head Coach VBA
Head Coach JKS,dhule.
this academy is established to creat an champions from the rural areas.and make popular badminton sports in whole rural district.