20/02/2025
*जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणांनी संचारला उत्साह*
*धुळ्यात “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा जल्लोषात संपन्न*
*धुळे, दिनांक 19 फेब्रुवारी, 2025 (जिमाका वृत्त):* श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणांनी आज धुळ्यात "जय शिवाजी, जय भारत" पदयात्रा जल्लोषात संपन्न झाली.
जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा नेहरु युवा केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने आज गरुड मैदान, धुळे येथे जय शिवाजी, जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रा कार्यक्रमास खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, संदीप पाटील, तहसिलदार अरुण शेवाळे, प्रविण चव्हाणके, क्रीडा अधिकारी एम.के.पाटील, रेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त शुभेच्छा देताना खासदार डॉ. शोभाताई बच्छाव म्हणाल्या की, श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वाना आत्मसात व्हावा, त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा या शूरवीर श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार अनुपभैय्या अग्रवाल म्हणाले की, सर्व नागरिकांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करुन केंद्र व राज्य शासनाने आयोजित केलेल्या “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रेत सहभागी झाल्याबद्दल उपस्थितांना धन्यवाद दिले. त्याचप्रमाणे आज सायंकाळी 7 वाजता मनोहर टॉकीज जवळील श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे. या ठिकाणी समस्त धुळेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही केले.
जिल्हाधिकारी श्री.पापळकर म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार आज श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची 395 व्या जयंती निमित्त “जय शिवाजी, जय भारत”पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रा आयोजनाचा मुळ उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचे संपुर्ण देशात अतिशय महत्वाचे स्थान आहे. त्यांच्या योगदानाचे सर्व नागरिकांनी स्मरण करुन त्यांचा विचारांचा ठेवा सोबत ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी धुळे युथ क्लब व धुळे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानातंर्गत किल्लेदार स्पर्धा मातीचे किल्ले स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच धुळे वनविभागाच्यावतीने एक पेड माँ के नाम अंतर्गत खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार अनुपभैय्या अग्रवाल तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर जय शिवाजी, जय भारत पदयात्रेस मान्यवरांच्या उपस्थितीत पदयात्रेचा शुभारंभ केला.
“जय शिवाजी, जय भारत” पदयात्रेची सुरवात गरुड मैदान येथुन सुरु होवून क्युमाईन क्लब - जेल रोड – तहसिल कार्यालय, राजवाडे बॅक, झाशी राणीपुतळा मार्गे – जुनी महानगरपालिका- पारोळा रोड मार्गे – प्रकाश टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.
या पदयात्रेत कमलाबाई कन्या हायस्कुल, कनोसा हायस्कुल, न्यु सिटी हायस्कुल, महाराणा प्रताप विद्यालय, चितळे माध्यमिक विद्यालय, जो.रा. सिटी हायस्कुल, राष्ट्रीय सेवा योजना तसेच सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पदयात्रेत सर्वानी जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देऊन परिसर दुमदूमून गेला.