09/07/2018
लोणावळा—भिमाशंकर ट्रेक.......एक अविस्मरणीय अनुभव
लोणावळा – कोंडेश्वर – पढरवाडी – भीमाशंकर - खांडस - कर्जत
५ ते ७ जुलै २०१८
प्रफुल्ल भोसले- पिनॅकल क्लब, मुंबई
ठरल्याप्रमाणे मी, राजेश, संतोष, पराग इंद्रायणी एक्सप्रेसने निघालो. (शशीचे ऐनवेळी येणे रद्द झाले). तांबे सर व काळे काका लोणावळ्याला भेटले. अन्नपुर्णा उपहारगृहात मिसळ, थालिपीठ, शिरा याचा आस्वाद घेऊन निघालो. वातावरण छान होते. पावसाची रीमझिम चालू होती आणि सर्वत्र धुक होते.उधेवाडीत घरुन आणलेला डबा फस्त केला. सायंकाळी कोंडेश्वर मंदिर व तेथुन जांभिवली गावात मुक्कामी वेळेवर पोहोचलो.
सकाळी चहा नाश्ता उरकुन निघालो. पावसामुळे नदीनाले दुथडी भरुन वाहत होते, सर्वत्र धुके पसरले होते. आता टेन्शन कुसुर पठाराचे होते. पठारावर अनेक वाटा आहेत आणि धुक्यातून पुढील वाट नीट दिसत नव्हती. त्यात जांभिवली गावातील एका सद्गृहस्थाने वाट दाखविण्याचे अव्वाच्या सव्वा पैसे सांगितले पण काळे काकांनी कुठेही न चुकता बरोब्बर धनगरवाडी व तेथुन कुसुर गावात नेले. कुसुर ते तळपेवाडी डांबरी रस्ता असल्यामुळे आम्ही गाडीने जायचे ठरविले. कारण पंधरा कीलोमीटर टार रोडने चालणे कुठल्याही ट्रेकरला त्रासदायकच वाटते. कुसुर गावातील गाडीवाला सुदाम याला शेतावर शोधुन आणण्याची कामगिरी एवढे दमल्यानंतर राजेश आणि संतोषने पार पाडली. गाडी मिळुन तळपेवाडीत वेळेवर पोहोचणे महत्वाचे होते कारण पढरवाडीत अंधार पडायच्या आत पोहोचायचे होते. पढरवाडीच्या वाटेत एक विलोभनीय धबधबा लागला (तसे वाटेत असंख्य धबधबे लागले पण हा मस्तच होता) माझी, काळेकाका, राजेश, पराग यांची धबधब्यात भिजण्याची ईच्छा होती पण संतोषच्या ओरडण्यामुळे आम्ही बेत रद्द केला कारण धबधब्याला पाणी खुपच होते. वांद्रेखिंड पार करून सायंकाळी पढरवाडीत वेळेवर पोहोचलो. पढरवाडीतुन वरसुबाईचा डोंगर व मंदिर दिसत होते (तासुबाई— वरसुबाई—भिमाशंकर ट्रेकची आठवण झाली). पढरवाडीत मुक्काम केला.
उद्याचे अंतर जास्त होते, भिमाशंकरला पोहोचुन अंधार पडायच्या आत खांडस गाठायचे असा बेत होता. रात्रभर मुसळधार पाऊस होता. सकाळी लवकर म्हणजे साडेसहा वाजता पढरवाडी सोडली. वाटेत एक नदी लागली. पाणी जास्त असल्यामुळे थोड्या वरच्या अंगाने कंबरेभर पाण्यातुन नदी पार केली. तिथे एक तारही गावक-यांनी आधारासाठी बांधली होती त्यामुळे नदी पार करणे सोपे झाले. डोंगर चढुन पठारावर पोहोचलो. तेथुन कमळजाईचे मंदिर वेळेवर गाठले. आम्ही सगळे खुष होतो कारण एवढ्या जोरदार पावसात व धुक्याच्या चादरीत आम्ही व्यवस्थित मार्गक्रमण करत होतो. आता भिमाशंकर दोन तासांवर होते. भिमाशंकरला छानशा हाॅटेलमधे गरमागरम जेवण जेवायचे अशी स्वप्न आम्ही बघत होतो. या खुषीतच आम्ही झपझप पावले उचलत होतो. तासभर खाली उतरल्यावर भिमानदी आडवी आली. पावसामुळे नदीला पाणी खुप होते व उतारामुळे फोर्सही खुप होता. पहील्यांदा साखळी करुन नदी पार करु असा अंदाज होता. पण नदीत उतरल्यावर ते शक्य नाही याचा अंदाज आला. आम्ही मागे फीरलो. वरच्या बाजुने नदी पार करु का? याचा अंदाज घेऊ लागलो पण तेही जमेना. मग रोपने नदी पार करायची असे ठरविले. आमच्यातील सगळ्यात उंच संतोषच्या कमरेला रोप बांधला , पाण्यात खोलीचा अंदाज यायला एक काठीही दिली.संतोष नदीत उतरला पण साठ टक्के अंतर पार केल्यावर संतोषच्या कमरेच्यावर पाणी गेले. पुढे तर त्याला खोलीचा अंदाज येईना व पाण्याचा करंटही जास्त जाणवला, खालुन पाणी खेचत होते. त्यामुळे त्याला परत बोलविले. आता काय करायचे हा मोठा प्रश्न होता. या सगळ्यात वेळही बराच गेला होता. परत कमळजाई मंदिर गाठायचे व तासुबाई—वरसुबाई ट्रेकच्या वेळेस ज्या वाटेने भिमाशंकर गाठले होते ती वाट शोधायची असे ठरविले. काळेकाकांना असा कुठला मार्ग आहे याची कल्पना नव्हती. पण मला ती वाट आहे यावर काॅन्फिडंस होता. धुक्यात ती वाट शोधणे जिकरीचे होते. मीही हा ट्रेक खुप वर्षापुर्वी व पावसात केला होता त्यामुळे वाट आठवत नव्हती पण दुसरा पर्याय नव्हता. परत वर चढत कमळजाई मंदिर गाठले व वाट शोधु लागलो. पुढे एक वाट मिळाली व वाटेवर बांधलेल्या रीबनमुळे तीच वाट असल्याची खात्री पटली व आम्ही रीलॅक्स झालो. मधे थांबुन आमच्याकडील पुरणपोळी, गुळपोळी, गुळशेंगदाणा पोळी फस्त केली. पुढे गेल्यावर वाट एका कड्याजवळ आली व ती खाली उतरत होती. असा कडा खाली उतरल्याचे मला व राजेशलाही आठवत नव्हते तरीही थोडे खाली उतरुन बघितले पण ती वाट खुप भीतीदायक होती. एका बाजूला डोंगर व दुस-या बाजुला दरी अशी अवस्था होती. जंगलात वाट काही मिळत नव्हती त्यात धुकही दाट होऊ लागले. काय करायचा हा यक्ष प्रश्न आमच्याजवळ होता. घड्याळात दोन वाजले होते. परत पढरवाडीला जायचे तर कीमान चार तास पाहीजे होते. ट्रेक पुर्ण होतो की नाही याची हुरहुर लागुन राहीली. पण काळेकाका म्हणाले की वाट शोधायची आणि भिमाशंकर गाठायचे. अर्धापाऊण तासच वाट शोधायची असे ठरविले. आम्ही मागे फीरलो. मी व राजेश वाट शोधु लागलो. यात परागने GPS वर लोकेशन शोधले व आपण भिमाशंकर देवळापासुन साधारण दोन कीमीवर आहोत असे सांगितले. त्यात मला एक वाट सापडली. GPS वरही दिशा बरोबर दाखवत होती. मधेमधे लागणारे कारवीचे जंगल आमच्या उंचीपेक्षाही माजलेले होते. मधेच वाट गायब व्हायची. पुन्हा GPS वर दिशा बघुन मार्गक्रमण करत होतो व तेवढ्यात एकदम मळलेली व दगड लावलेली वाट मिळाली. आता आमचा काॅन्फीडंस पुन्हा एकदा वाढला. पण जोपर्यंत उजव्या बाजुला दरी येत नाही तोपर्यंत भिमाशंकरची ही वाट योग्य आहे याची खात्री होत नव्हती. कारण मागील वेळेस भिमाशंकरच्या जवळ गेल्यावर उजव्या बाजुला दरी लागते हे मला बरोबर आठवत होते. तेवढ्यात उजव्याबाजुच्या डोंगरात एक वाट दिसली. आम्ही उभ्या असलेल्या डोंगराच्या आणि त्या डोंगराच्या मधे एक नाला होता. मला आठवले, हो खात्रीच पटली की हीच ती वाट. तरीसुद्धा GPS वर पुन्हा दिशा बघितली तर ती जुळली. त्या वाटेने पुढे गेल्यावर एका बाईचा आवाज ऐकला ती गुरांना हाकत होती. आम्ही खुष झालो. बाईने सांगिंतले की ही वाट देवळाजवळच जाते. देवळात पोहोचायला साडेतीन वाजले. आम्ही खांडस गाठायचे ठरविले.
त्यात तांबेसर मोबाईल पढरवाडीत विसरले होते व तेथे काॅन्टॅक्ट होत नव्हता. त्यांना पढरवाडीला जाण्या शिवाय पर्याय नव्हता. त्यांना एसटी स्टॅंडवर सोडुन आम्ही खांडसकडे निघालो, सव्वाचार वाजले होते. खांडसला गाडीवाल्याला मोबाईलवर साडेसातला पोहोचतो असे सांगितले होते. दिवसभराच्या थकव्यानंतरही आम्ही सव्वा तासात खांडस गाठले.
सगळ्या संकटावर मात करुन ट्रेक पुर्ण केल्याचा आनंद सगळ्यांच्या चेह-यावर दिसत होता.