12/02/2022
परभणी-धारासुर-परभणी
मागील आठवड्यात 250 किलोमीटर परभणी-लोणार-परभणी हा गमतीदार व आनंददायक प्रवास आम्ही नुकताच अनुभवून आलो होतो.त्यानंतर आज परत रविवारी दि.06 /02/2022 मी दिपक तळेकर व माझे मित्र राहुल सिरसेवाड गुरुजी आम्ही दोघांनी सायकलवर फेरफटका मारण्याचे ठरवले. त्यानिमित्त आम्ही दोघांनी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या ऐतिहासिक मंदिरास भेट देण्याचे ठरवले.या प्रवासाकरिता आमचे जाण्या येण्याचे एकंदरीत अंतर हे साधारण 70 किमी होते. या प्रवासासाठी आम्ही पहाटे लवकरच तयार होऊन सुरुवात केली.ते ऐतिहासिक मंदिर कुठले असेल बरं? तर ते मंदिर धारासुर येथील ऐतिहासिक गुप्तेश्वर मंदिर होय.या मंदिरास जाण्यासाठी परभणी ते गंगाखेड रोडवर साधारण 27 किमी वर उजव्या बाजूस आत मध्ये वळून साधारण 5 ते 7 किमी धारासुर येथे गोदावरी नदीच्या काठावर नैऋत्य दिशेला असलेले हेच ते गुप्तेश्वर मंदिर. या मंदिरास पूर्व बाजूस मुख्य द्वार असून दुसरे द्वार दक्षिण बाजूस या व्यतिरिक्त एक द्वार उत्तर बाजूस आहे.मंदिराच्या आतील व बाहेरील भागावरील विलोभनीय असे रेखीव व बोलके शिल्प आम्हाला भुरळ घालणारे होतेच.मंदिरच्या आतील भागात भव्य असा सभामंडप होता व गाभाऱ्यात शिवलिंग स्थापित होते.मुळात हे विष्णूचे मंदिर असावे.चालुक्य कालीन बरीच वैशिष्ट्ये या मंदिरात पाहायला मिळतात.साधारणत: बाराव्या शतकामध्ये चालुक्यांची सत्ता असताना मंदिर बांधलं असावं असो… मला इतिहासाबद्दल फारस ज्ञान नाही. मंदिराच्या चोहू बाजूंनी निरीक्षण करून फोटो काढत असताना ग्रामस्थ मंडळींची भेट झाली.कुठून आलात? परभणी वरून का? सायकलवर आलात का?असे त्यांचे बरेच प्रश्न समोर होते.मी व गुरुजींनी आमचा हुद्दा व परिचय ग्रामस्थ मंडळींना करून दिला.परिचय झाल्यावर गावातील युवकांनी आमच्याकडून मंदिराबाबत अभिप्राय लिहून घेतला. आणि आमच्या सोबत फोटो सुद्धा घेतले. सदरील मंदिराची पडझड सुरु असल्याने या वास्तूचे जतन व्हावे यासाठी गावकरी लढा देत असल्याचे समजले.त्यानंतर युवकांनी चहा घेण्याचा आग्रह केला.गुरुजी व मी नको नको म्हणत असताना तो पर्यंत चहा पाणी आमच्या समोर पोहोचले चहा घेत असताना त्यांनी अश्या प्रकारचे मंदिर कुठे कुठे आहेत त्यांनी आम्हास सांगितले. आम्ही ती सर्व माहिती गोळा करून परतीच्या प्रवासास निघण्याचे ठरवले.पण... तेथील गावकरी निवृत्ती कदम सर यांनी आता नाश्ता तयार आहे तो करूनच जा असा प्रेमाने आग्रह केला. त्यांचा तो साधेपणा व आपुलकी पाहून मी व गुरुजी त्यांना टाळू शकलो नाही. मग काय त्यांनी मंदिरा समोरच आपल्या घरी आम्हाला आपल्या पाहुण्यासारखे आदरातिथ्य केले. आणि आम्हाला आज त्यांच्याकडे छान छान पोहे खाण्यास मिळाले. असे पोहे जे की कुठल्याच हॉटेल मध्येही मिळणार नाही अगदी चविष्ट. नाश्ता करून झाल्यावर निवृत्ती कदम सरांनी आमच्या सोबत फोटो सुद्धा घेतले.त्यानंतर मी व गुरुजी तिथून परत निघालो. हे असे का? माहिती नाही. आम्ही दोघे काही सेलिब्रेटी आहोत की काय?असे जाणवत होते.खरचं कदम सरांच मन खूप मोठे आहे. खरी श्रीमंती काय असते? हे आज त्यांच्यात पाहावयास मिळाली. मी गुरुजींना पुढे आल्यावर म्हणालो खरचं कदम सरांचे साधे राहणीमान असले तरी ते आपल्या पेक्षा खूप श्रीमंत आहेत.आपणही या सुंदर मंदिरास वेळ काढून भेट द्यावी. हे सगळे सायकल वर गेल्यामुळे अनुभवयास मिळाले यात कुठलीही शंका नाही.
शब्दांकन.
श्री दिपक तळेकर:9823587999