आठवणींचे वलय

आठवणींचे वलय माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती,त्यांनी केलेले संस्कार, आणि त्यांचे जीवनानुभव याचे प्रगटीकरण.

न .ह .राका हायस्कूल बोदवड ही माझी शाळा .एक ऑगस्ट 1945 ला शाळेची स्थापना झाली .एक ऑगस्ट हा शाळेचा वर्धापन दिन. शाळा सोडून...
01/08/2026

न .ह .राका हायस्कूल बोदवड ही माझी शाळा .एक ऑगस्ट 1945 ला शाळेची स्थापना झाली .एक ऑगस्ट हा शाळेचा वर्धापन दिन. शाळा सोडून जवळपास 50 वर्षे झाली तरीही शाळेविषयीच्या आठवणींचे तरंग मनात उमटत राहतात. माझी शाळा गावाबाहेर अतिशय प्रशस्त जागेत आहे. शाळेची सकाळ मधुर गीतांनी होई. ज्ञानेश्वरांच्या विरहणी ,चाफा बोलेना अशी गीते आम्ही ऐकत असू. बोदवडचे शांत वातावरण, शितल वारा आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील 'ज्योती कलश छलके' हे गीत ऐकले की आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था होई. यानंतर शाळेची घंटा वाजे .
विविध शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण अशा शाळेत मला शिकायला मिळाले. हे मी माझे भाग्य समजते .शाळेची भव्य इमारत, दोन क्रीडांगण ,ड्रॉइंग हॉल ,तीन प्रयोगशाळा , कार्यानुभव साठी स्वतंत्र कार्यशाळा ,स्पोर्ट्स रूम ,लेडीज रूम, शिपायांसाठी क्वार्टर ,चित्रपट दाखवण्यासाठी प्रोजेक्टर , बँड ,शाळेचे शेत, विहीर अशा विविध सोयी शाळेत होत्या.

ड्रॉइंग हॉलमध्ये चित्रकलेच्या तासिकेला आम्ही चित्र काढायला जात असू. त्या ठिकाणी भिंतीवर विविध तैल चित्रे लावण्यात आलेली होती. स्थिरचित्र काढण्यासाठी कपाटात लाकडी फळे, आकर्षक भांडी ठेवलेली होती ते पाहून मन हरकून जात असे. चित्र काढण्यासाठी उतार असलेले डेस्क होते .कधी कधी याच ड्रॉइंग हॉलमध्ये आम्हाला चित्रपट दाखविला जाई. वर्गात शिपाई आला आणि त्याने सरांना सांगितले की" विद्यार्थ्यांना ड्रॉइंग हॉलमध्ये पाठवा" हे ऐकले की अंगात दहा हत्तींचे बळ येई. शिकण्यापेक्षा चित्रपट पाहणे हा आनंदोत्सव होई .आम्हाला शेजारी हा चित्रपट दाखवला होता. रक्ताभिसरण कसे होते याची चित्रफीत दाखवण्यात आली. विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने हे कार्यक्रम महत्त्वाचे होते. शाळेत कार्यानुभव हा विषय मौखिक पद्धतीने शिकवला जात नसे तर प्रत्यक्ष कार्याचा अनुभव दिला जाई. सुतारकाम, शेतीकाम ,इलेक्ट्रिक फिटिंग यासारखे विषय तेव्हा कार्यानुभव साठी होते. शेतात आम्ही कापूस वेचला, निंदणी केली. निसर्गाच्या सानिध्यात काम करताना खूप आनंद होई. इलेक्ट्रिक फिटिंग करताना एक सर, दुसर जोडणी आम्ही शिकलो. जीना वायरिंग शिकलो .दिवा लागला की आपण यशस्वी झालो याचे समाधान वाटे. सुतार काम करताना करवतीचा आवाज लयबद्ध वाटे.

शाळेच्या विहिरीजवळ रेतीचा मोठा ढीग असे. त्यावर शंख ,शिंपले वेचणे हा आमचा छंद होता .याच विहिरीच्या जवळ असलेल्या ओट्यावर बसून परीक्षेच्या काळात आम्ही अभ्यास करीत असू. पावसाळ्यात हिरवळीवर लाल रंगाचा मृग किडा दिसे .हिंदीत ज्याला वीरबहुटी म्हणतात . त्याची त्वचा मखमली कापडासारखी दिसे.त्याला हातात घेऊन हळुवारपणे आम्ही त्याच्या अंगावर हात फिरवत असू. तेव्हा खूप रोमांचित झाल्यासारखे वाटे . शाळेच्या बागेत पारिजातक, मोगरा ,चांदणीची फुले बहरत. या फुलांच्या सोबत आमचे जीवनही सुगंधित झाले.

पाचवीत पहिली तासिका मराठीची असे .छाजेड सर आमचे वर्गशिक्षक होते. सर वर्गात येण्याच्या आधीच आम्ही पारिजातकाची फुले उलटी ठेवून मराठी लिहीत असू. सर वर्गात आले की आम्हाला शाबासकी देत. छाजेड सर मराठीच्या कविता आमच्याकडून पाठ करून घेत असत.म्हणून आजही घाल घाल पिंगा वाऱ्या, या झोपडीत माझ्या ,क्रांतीचा जयजयकार यासारख्या कितीतरी कविता पाठ आहेत. महाविद्यालयात शिकवताना या कवितांचे संदर्भ मला उपयोगी ठरले.

पवार सरांनी सबके लिए खुला है, बलसागर भारत होवो अशी अनेक गीते शिकवली तर पुराणिक सरांनी सरस्वती स्तोत्र शिकवले .हे शिकवताना प्रत्येक शब्दाच्या उच्चारणाकडे या द्वयीनी लक्ष पुरविले.उच्चारण चुकले तर पुन्हा पुन्हा म्हणायला लावले .चांगले पाठांतर करून घेतले. दांदडे सरांनी नाट्यीकरणातून इंग्रजी शिकवले .शैक्षणिक साधनांचा उपयोग सर करत असत.कुलकर्णी सरांनी इंग्रजीचे स्पेलिंग पाठ करून घेतले. स्पेलिंग पाठ नसले तर सर छड्या मारत . त्यामुळे छडीच्या धाकाने का होईना आम्ही स्पेलिंग पाठ करत असू. शाळेत येण्यास उशीर झाला म्हणजे जोशी सर एक राऊंड मारायला लावत .पायात चप्पल नसे. पृथ्वीच्या गुरुत्वीय शक्तीच्या संपर्कात आम्ही होतो असे जरी आज वाटत असले तरी पळताना हिरवळीतून गोखरू केव्हा रुतेल हे सांगता येत नव्हते. शरीर आखसून प्रचंड तणावाखाली आम्ही पळायला सुरुवात केली की आठ दहा पावलांवर खसकन गोखरू पायात रूते .प्रचंड वेदना होत. दुसऱ्या दिवशी शाळेत वेळेवर हजर राहण्याची सवय लागे. शिक्षक जर बाजूने चालत असतील तर आम्ही बोलणे बंद करत असू . आदर युक्त भीती मनात होती.आज बरेच विद्यार्थी शिक्षकांचा एकेरी उल्लेख करतात हे पाहून वाईट वाटते.

माटे सरांकडे विद्यार्थी ग्राहक भांडाराची जबाबदारी होती .सर आम्हाला हिंदी शिकवत . सर स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि मायाळू. इतर शिक्षकांची आम्हाला भीती वाटे .पण सरांच्या मायाळू स्वभावामुळे त्यांच्याशी बोलताना जरा मोकळेपणा येई. सरांना वर्गावर यायला उशीर झाला म्हणजे आम्ही ग्राहक भांडारात त्यांना घ्यायला जात असू. एखादी गोळी किंवा चॉकलेट मिळे. सर आमच्या नावाचा एकारांत उल्लेख करत असत . जसे रमे, उमे संधे. वहीला कव्हर नसले की म्हणत "तू कपडे घातले वहीला का नाही घातलेस? ऐकणारी मुलगी लाजून खाली मान घालत असे . जून महिन्यात सरांकडून नव्या वह्यांचा संच खरेदी केला की कोऱ्या पानांचा सुगंध मनाला मोहिनी घालत असे .पावसाळ्यातील मृदगंध आणि या वह्यांचा गंध दोन्ही नवनिर्मितीचे ,सृजनांचेच तर गंध होते. चंदन सरांचे अक्षर अतिशय सुंदर होते, ते फळ्यावर लिहीत असत तेव्हा त्यांच्या अक्षराची नक्कल करून तसेच अक्षर काढण्याचा प्रयत्न मी करत असे. कासार सरांनी 'महदंबेचे ढवळे’ शिकवले. विवाह प्रसंगी गायले जाणारे हे गीत .सरांचे स्पष्ट शब्दोच्चार,ओघवती भाषाशैली, अभ्यासपूर्ण विवेचन आजही आठवते. वाणी सर शांत आणि गंभीर वाटत. तर दिवाण सर हसतमुख व्यक्तिमत्वाचे होते.

शाळेत गणेशोत्सव साजरा होत असे .तेव्हा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येई. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जाई. भारतीय संस्कृतीतील प्रादेशिक परंपरा आणि वेशभूषा यांचे महत्त्व सांगणारे एक समूहगीत आजही आठवते . त्या गीताचे बोल असे होते- देशोदेशीच्या नारी आम्ही गाऊया गाणी हो गाऊया गाणी कलकत्त्याची मी बंगाली देवी माझी महाकाली भजनाला जाई हो . तर शिक्षणाचे महत्त्व सांगणारे आणि ‘ आने से उसके आये बहार ‘या गीताच्या चालीवर आधारित एक गीत नलू नावाच्या विद्यार्थिनीने सादर केले होते .पांढरा पायजमा, शर्ट आणि आडवी टोपी असा गबाळा अवतार धारण करून ती गात होती-.

शाळेची ती इमारत पाहून जीव जळे हा राहून राहून.
नाही शिकलो शाळा मी राहिलो अडाणी.

या गीताने शिक्षणाचे महत्व मनात अधोरेखित केले. गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी मिळणाऱ्या प्रसादाची चव आजही जिभेवर आहे. तर शाळेच्या बाहेरील गाडीवाला पांडू दादाची चण्याची मिसळ अजूनहीआठवते.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने शाळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत फक्त तीनच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. त्यापैकी एक वेळेवर उपस्थित राहिला नाही. एक खैरनार म्हणून विद्यार्थी होता तो खूप छान बोलत असे .त्याचा स्पर्धेत प्रथम क्रमांक येई. तो पुढे वकील झाला .पण जो दुसरा विद्यार्थी होता त्याचे भाषण पाठ नव्हते .तो बोलायला उभा राहिला "अध्यक्ष महोदय ,पूज्य गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो! लोकमान्य टिळकांनी देशासाठी जे नाही ते केलं आणि माझं भाषण पाठ नाही म्हणून मी बसतो.”( टाळ्या )त्याचा दुसरा नंबर आला आणि त्याला बक्षीसही मिळाले. दर बुधवारी बँडच्या तालावर आमची सामूहिक कवायत होत असे. विद्यार्थीच बँड वाजवत असत. यामुळे स्किल डेव्हलपमेंट होई .

वर्ग मॉनिटरचा आम्हाला खूप धाक वाटत असे .सर वर्गात नसताना तो बोलणाऱ्यांची नावे लिहीत असे. मग शिक्षक वर्गात आले की शिक्षा करत .आमचा वर्ग मॉनिटर जे.डी.सी.सी. बँकेत भेटला. तो शिपाई म्हणून बँकेत कामावर होता .आमचा बॉस दुसऱ्यांच्या आज्ञा पाळत होता हे पाहून गंमत वाटली. पाचवीच्या वर्गात जी. के. पाटील आणि एस .व्ही .पाटील नावाचे जलचक्र चे दोन विद्यार्थी होते. ते पहिला आणि दुसरा नंबर कधीच चुकवत नसत. माझा तिसरा नंबर येई. मला नेहमी वाटे की आपला पहिला किंवा दुसरा नंबर यावा पण तसे कधी झालेच नाही. हिंदीत वर्गात सर्वात जास्त मार्क्स मिळाले याच आनंद मात्र याच वर्षी झाला. शाळेने श्रवणीय गीते, कविता ,चित्रपट, वक्तृत्व , आणि विविध कलाविष्काराच्या माध्यमातून पंच संवेदनांचा जागर केला.

शाळेत असताना लगोरी, खो-खो ,कबड्डी खूप खेळलो. जनरल चॅम्पियनशिप म्हणून खेळाचे वार्षिक बक्षीस असे .तीन खेळांमध्ये प्रथम येणाऱ्याला हा सन्मान मिळत असे. 1974 यावर्षी मला हे बक्षीस मिळाले. विद्यालयात बोर्डवर नाव लिहिले गेले याचा खूप अभिमान वाटला . 1971 ला दुष्काळ पडला होता. तेव्हा आम्हाला वडिलांनी वॉटर बॉटल घेऊन दिल्या . एरव्ही नळावर ओंजळीने पाणी पीत होतो. ज्याच्या हातात नळाची तोटी तो त्याच्या मित्रांना आधी पाणी पिऊ देत असे .मग आम्ही वाट पाहत बाजूला उभे राहत .आज सर्वच विद्यार्थ्यांजवळ वॉटर बॉटल असते. स्कूल बॅग असते. आम्ही पिशवीत पुस्तके आणि वह्या नेत होतो. पिशवी आतल्या बाजूस ओढून सेफ्टी पिन लावून तिला लहान केली की खूप छान वाटे. खाकी कलरचे कव्हर कधी मिळालेच नाही .वह्या आणि पुस्तकांना वृत्तपत्राचे कव्हर आम्ही लावत होतो. नाव, वर्ग, विषय लिहिण्यासाठी कार्टून असलेले छोटे स्टिकर आपल्याला मिळावे ही खूप इच्छा होती पण ते मिळालेच नाही .माझ्याजवळ क्रेऑनचा बॉक्स होता. त्या रंगांनी मी मराठीच्या पुस्तकातील ऑलिंपिकची वर्तुळे रंगवली होती.दुसऱ्या दिवशी तो बॉक्स हरवला. ऑलिंपिकच्या त्या वर्तुळांवर हात फिरवून माझी पेटी कोणाजवळ असेल? कोणी घेतली असेल? असा विचार करून खूप वाईट वाटत होते.एकाच दिवसात बॉक्स हरवला म्हणून आता दुसरा मिळणार नव्हता. आज माझ्या नातवाजवळ ड्रॉइंग किटस् असतात. तो खजिना पाहून नव्या पिढीचा हेवा वाटतो.माझ्या पिढीतील जवळजवळ सर्वांनीच जुन्या पुस्तकांवर अभ्यास केला .आज इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये दरवर्षी नवी पुस्तके ,नवी बॅग ,नवे कपडे खरेदी करावे लागतात. माझ्या नातवाच्या दोन वर्षाच्या फी मध्ये माझे सर्व शिक्षण झाले हे पाहून हसावं की रडावं कळत नाही .कर्मवीर भाऊराव पाटील ,महात्मा फुले यांच्याआदर्शावर चालणाऱ्या शाळा पूर्वी होत्या. सवलतीमुळे आम्ही फी सुद्धा भरत नव्हतो .तरीही शाळेने इतक्या सुविधा पुरवल्या. शिक्षणाचा बाजार होताना पाहून काहीतरी परिवर्तन व्हावे असे वाटते. शिक्षण प्रक्रिया मूल्याधिष्ठित असावी असे वाटते .

शैक्षणिक सुविधा आणि ज्ञानार्जनाचे हे वैभव माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना प्राप्त झाले त्याचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक स्वर्गीय म. दि.राव सरांना आहे. सरांची कल्पकता ,व्यासंग, व्यवस्थापनाचे कौशल्य ,गुणवत्ता वाढीसाठीचे प्रयत्न ,विद्यार्थी हिताची तळमळ , शिस्त, सुविधा निर्मिती यामुळे आम्हा विद्यार्थ्यांचे जीवन सर्वांगाने बहरले. प्रार्थनेच्या वेळी सर आमच्याशी संवाद साधत. त्यांचे बोलून झाले की दोन्ही हात मागे बांधून खाली मान घालून निघून जात. सरांनी 'हितगुज 'नावाचे एक सदर सुरू केले होते .विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे ते एक माध्यम होते .15 ऑगस्ट, 26 जानेवारी या दिवशी सकाळी 'चलो सिपाही चलो 'हे गीत लागले की सैनिकाच्या आवेशात शाळेकडे आमची पावले पडत .याच दिवशी सर क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसंग्रामाविषयी विद्यार्थ्यांसमोर बोलत. त्यामुळे देशाभिमान जागृत होई. आज बऱ्याच शाळांमध्ये झेंडावंदन हाऔपचारिक कार्यक्रम म्हणून पार पाडला जातो. दहावीच्या वर्गाची एखादी तासिका सर घेत असत .तेव्हा संदर्भासहित उदाहरणे देत . प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टपणे आकलन होऊन विषय समजत असे. शाळेत असताना मुख्याध्यापक कार्यालयात जाण्याची वेळ कधी आलीच नाही .कारण फार मोठी चूक झालेली असेल तरच मुख्याध्यापकांच्या कार्यालयात विद्यार्थ्यांना बोलवण्यात येई. काही वर्षांनी बी .एड .करताना मला प्रकल्प लेखन करायचे होते .तेव्हा राव सरांना भेटण्याचा योग आला . सरांच्या समोर मी बसले होते. सर माझ्याशी बोलत होते.वारकऱ्याला प्रत्यक्ष पांडुरंग भेटल्याचा तो आनंद होता. माझ्या महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राव सर उपस्थित होते .त्याप्रसंगी भाषणात ते म्हणाले ,"शिक्षकाने सूर्यासारखे तेजस्वी असावे .सूर्य प्रखर तेजाने तळपतो तेव्हा थोडीफार उष्णता पृथ्वीवर पोहोचते. त्याप्रमाणेच शिक्षकाच्या जवळ जर अफाट ज्ञान असेल तर थोडेफार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकते.”कार्यशैली आणि विचाराच्या रूपाने सर आमच्या कायम स्मरणात राहतील .

संस्थेचे चेअरमन ॲड .प्रकाशचंद्रजी सुराणा एक प्रभावी वक्ता. त्यांची भाषणे आम्ही मनापासून ऐकत असू .अकरावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला त्यांच्याकडून मनगटी घड्याळ बक्षीस दिले जाई.हा सर्वोच्च सन्मान असे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी अशी बक्षीसे प्रेरणादायी ठरतात.

शाळेत जाण्यासाठी जन्मदात्र्या आईच्या कंफर्ट झोन मधून बाहेर यावे लागते. व्यावहारिक जगात प्रवेश करण्यासाठी शाळा रुपी आईच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावे लागते. पण व्यावहारिक जगात उभे राहण्याचे सामर्थ्य शाळाच देते. 1945या वर्षी लावलेल्या माझ्या शाळेच्या इवल्याशा रोपाचा वेलू आज गगनावरी गेला आहे संस्थेचा विस्तार होत आहे. उत्तरोत्तर हा विस्तार असाच होत राहो ही वर्धापनदिनी हार्दिक शुभेच्छा! . .
माजी. प्रा. संध्या राजपूत
#बोदवड

06/05/2025
पाण्यात दगड फेकल्यावर पाण्याची वलय निर्माण होतात आणि पाण्यातच विरून जातात .बोदवड माझे माहेर .बोदवडची आठवण झाली की मनात आ...
04/05/2025

पाण्यात दगड फेकल्यावर पाण्याची वलय निर्माण होतात आणि पाण्यातच विरून जातात .बोदवड माझे माहेर .बोदवडची आठवण झाली की मनात आठवणीची असंख्य वलय निर्माण होतात .बोदवड हे नाव कसे प्रचलित झाले ?याविषयी एक व्युत्पत्ती सांगितली जाते .गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले .या बोधिवृक्षाची एक शाखा त्यांनी बोदवडला लावली .बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला म्हणून या जागेचे नाव बोधिवड असे ठेवण्यात आले. बोधीवडचे बोधवड आणि बोधवडचे बोदवड असे रूप नंतर प्रचलित झाले .
बोदवडला असताना ज्या व्यक्ती माझ्या जीवनात आल्या त्यांच्या जीवनानुभवाचा मला जो फायदा झाला त्यांनी माझ्यावर जे संस्कार केले त्या आठवणीच्या पहिल्या वलयात डोकावून पाहताना माझ्या आईची गोरीपान, नाकीडोळी नीटस ,सुंदर मूर्ती दिसू लागते.माझ्या आईचं बालपण खूप श्रीमंतीत गेलं. तिच्या वडिलांच्या घरी भरपूर शेती होती .दूध दुभत्या म्हशी कायम असत. आईला आजही दूध दही खायला आवडतं. तिची त्वचा खूप कोमल आणि चमकदार आहे .माझी एक ब्युटीशियन मैत्रीण आईला पाहून म्हणाली होती "मावशी तुम्ही खूप सुंदर दिसता !"आई लाजून म्हणाली "आता म्हातारपणी कसलं सुंदर नी काय".
माहेरी असताना आईने हरिणीचे पाडस पाळले होते. त्याच्याबरोबर ती खेळत असे आणि बाटलीने त्याला दूध पाजत असे .त्याकाळी मनोरंजनाची फारशी साधने नसल्यामुळे बुधवारच्या बाजारात जाऊन फेरफटका मारणे , डोंबारी व गारोडीचे खेळ पहात उभे राहणे हा तिचा छंद होता .आईचा हा बालसुलभ स्वभाव आजही कायम आहे. एखादी मिरवणूक जात असली की आई आवर्जून बघायला जाते .तिचं बालपण असं सुखात गेलं. लग्नानंतर तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागले पण तिने तक्रार केली नाही
तिचा स्वभाव शांत आहे. समाधानी राहणं तिला आवडतं .सगळ्यांशी जुळवून घेणं तिला जमतं. म्हणून इतरांना गर्विष्ठ वाटणारी माणसेही तिच्याशी बोलतात .
अद्वैत तत्त्वज्ञान रोजच्या जगण्यातून आईने आम्हाला शिकवले .भारतीय तत्त्वज्ञानात अद्वैताचा अर्थ "देव एक आहे " असा आहे .साने गुरुजी अद्वैताचा वेगळा अर्थ सांगतात "तू आणि मी दोन नाही एक आहोत."शारीरिक इजा केली की मला वेदना होते तशी तुलाही होते म्हणून दुसऱ्याच्या वेदना जाणून घ्यायला हव्या. हाच अर्थ आईने आम्हाला शिकवला. प्रसंग असा घडला होता. लहानपणी चिमण्यांना घरात कोंडून आम्ही चादरी खाली पकडत असू .त्या पळून पळून थकल्या की आम्हाला खूप आनंद होई .एक दिवस आम्ही चिमण्यांना छळत असताना आई स्वयंपाक घरातून बाहेर आली आणि म्हणाली "का त्रास देता त्यांना ?तुम्हाला कोणी अशा वेदना दिल्या तर तुम्हाला किती दुःख होईल? त्या दिवसापासून चिमण्यांना त्रास देणे आम्ही बंद केले.
उन्हाळ्यात चुलीवर स्वयंपाक करताना आईच्या कपाळावर घामाच्या धारा लागत. आम्ही मात्र गरम गरम पोळ्यांचा स्वाद घेत असू .सर्वांचे जेवण झाल्यावर आई जेवत असे .तिच्यासाठी भाजी शिल्लक आहे की नाही याची काळजी वडील घेत." तुम्ही सर्वांनी जेवले की माझे पोट भरते "असे आई म्हणायची .भाजी संपली म्हणजे भाजी चांगली झाली होती असा विचार करून तिला समाधान वाटत असे.
शिस्तीच्या बाबतीत ती कठोर होती. ओट्यावर खाट टाकून त्यावर ती बसे .मला पायाजवळ बसवी .उत्तर चुकले की फटकन पट्टीने मारी. रडू आले तरी रडू देत नसे.मग हुंदके देत उत्तरे द्यावी लागत.
उन्हाळ्याची सुट्टी होती .तिने आम्हाला काही काम सांगितले की आम्ही दोघी बहिणी" जा मी नाही करणार "!असे उत्तर देत होतो .तिने एका दिवशी झाडूने चांगला मार दिला .दुसऱ्या दिवसापासून सगळी कामे आम्ही विना तक्रार करू लागलो. पण कॉलेजचा अभ्यास करताना आईने घरकामे करायला लावली नाही. जेव्हा मुलींकडून फक्त घर कामाची अपेक्षा केली जात होती तेव्हा तिने आम्हाला अभ्यास करू दिला .तिच्यामुळेच आम्हाला शिक्षणाचा उपयोग झाला.
आईने कृतज्ञता भाव शिकवला .कोणी आपल्याला मदत केली तर त्याचे स्मरण ठेवून आपणही मदत करावी असे ती शिकवत असे.
एकदा मीआजीच्या घरची वाटी घेऊन आले. आईच्या ते लक्षात आले. मला ती रागवली. आजीची वाटी देऊन ये असे म्हणाली. या प्रसंगाने कोणाची वस्तू घेऊ नये हे मनावर पक्के बिंबले .आईने असे छोट्या छोट्या प्रसंगातून संस्कार केले. तिने केलेले संस्कार म्हणजे अभिषेक पात्रातून ठिबकणारे थेंब !
आईला निरामय आरोग्य लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना

Address

Bhusawal
425201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आठवणींचे वलय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share